शाळेच्या वयात घेतलेला निर्णय, चार वर्षांत उभा केला लाखोंचा मशरूम व्यवसाय
प्रभु रंजनची प्रेरणादायी यशोगाथा
“यशासाठी वय नाही, गरज असते ती फक्त धाडसाची!”
हे वाक्य खरं करून दाखवलं आहे बिहारमधील एका तरुणाने — प्रभु रंजन. ज्या वयात बहुतांश मुलं शाळा, कॉलेज आणि भविष्याच्या गोंधळात असतात, त्या वयात प्रभुने थेट व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज अवघ्या २१ व्या वर्षी तो दरवर्षी १२ हजार किलो बटण मशरूम उत्पादन करून लाखोंचा नफा कमावत आहे.
अभ्यासात मन न रमताच घेतला वेगळा मार्ग
प्रभू रंजनला लहानपणापासून अभ्यासात फारसा रस नव्हता दहावी येईपर्यंत त्याला जाणवलं की पारंपरिक शिक्षण आणि नोकरीचा मार्ग आपल्यासाठी नाही.
बराच विचार, शोध आणि माहिती गोळा केल्यानंतर त्याचं लक्ष गेलं मशरूम शेतीकडे. कमी जागा, कमी गुंतवणूक आणि जलद उत्पादन हे सगळे फायदे पाहून त्याने मशरूम शेतीचा निर्णय पक्का केला.
घरातूनच केली सुरुवात
प्रभूच्या कुटुंबाकडे आधीपासूनच गहू आणि भात शेती होती याच शेतीतील भाताचा पेंडा आणि गव्हाचा भुसा त्याने मशरूम शेतीसाठी वापरला. घरातच बांबूच्या साह्याने साधी रॅक तयार केली आणि रुपये पाच हजार खर्च करून 200 मशरूम बॅग्स लावल्या. अवघ्या ३० दिवसांत मशरूम उत्पादन सुरू झालं. स्थानिक बाजारात विक्री करून पहिल्याच हंगामात त्याला सुमारे ₹४५,००० उत्पन्न मिळालं. हा क्षणच त्याच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा ठरला.
घाई नाही, अनुभव महत्त्वाचा.
प्रभुने लगेच मोठा विस्तार केला नाही. पहिली तीन वर्षे त्यांनी फक्त हंगामी पद्धतीने मशरूम उत्पादन केलं. दरवर्षी सुमारे 200 बॅग्स लावून तो अनुभव घेत राहिला या काळात त्यांनी उत्पादन बाजार भाव हवामान आणि खर्च याचा सखोल अभ्यास केला. या टप्प्यात त्याला दरवर्षी साधारण 50 हजार रुपये उत्पन्न मिळत होत.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
२०२४ मध्ये प्रभुने एक मोठं पाऊल उचललं. त्याने १८ x ४० फूट आकाराची एअर कंडिशन मशरूम युनिट सुरू केली. या युनिटमध्ये एकाच वेळी २५०० बॅग्स ठेवता येतात..
आता तोः
दिल्लीहून दर्जेदार स्पॉन मागवतो, पाइप पद्धतीने स्वतः कंपोस्ट तयार करतो, तापमान आणि आर्द्रतेवर पूर्ण नियंत्रण ठेवतो, यामुळे खर्च कमी झाला आणि उत्पादनाचा दर्जा अधिक चांगला झाला.
आजची कमाई किती आहे?
कोल्ड युनिटमुळे तो वर्षभर चार हंगामांत मशरूम उत्पादन करतो. दरवर्षी १२,००० किलो मशरूम विकून ₹१८ लाखांचं उत्पन्न मिळवत असून सर्व खर्च वजा केल्यावर सुमारे १० लाखांचा निव्वळ नफा मिळवतो.
तरुणांसाठी मोठी प्रेरणा
प्रभु रंजनची यशोगाथा एकच गोष्ट शिकवते
योग्य नियोजन, संयम आणि मेहनत असेल, तर लहान वय, कमी भांडवल किंवा ग्रामीण भाग हे कधीच अडथळा ठरत नाहीत. आज तो फक्त यशस्वी उद्योजक नाही, तर अनेक तरुण शेतकरी आणि नवउद्योजकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
